दौती विषयी

प्राचीनतम लेखनाचा नमुना म्हणजे शिलालेख होय. शिलालेख कोरण्यापूर्वी शिलाखंड गुळगुळीत करण्यात येई. त्यावर काळ्या शाईने किंवा खडूने मजकूर लिहीत त्यामुळे शाई ठेवण्यासाठी एखादे भांडे वापरात असणारच. ते शाईचे भांडे म्हणजेच नंतरच्या काळातील दौत होय. लिहून दिलेला तो मजकूर नंतर कोरके खोदत असत. भारतात सापडलेला सर्वात जुना शिलालेख मौर्य सम्राट अशोककालीन असल्याने दौतींचा इतिहास सम्राट अशोकाच्या काळापर्यंत मागे नेता येतो.


दौत म्हणजे शाई ठेवण्याचे भांडे किंवा पात्र होय. शाईपात्र पुष्कळदा पितळेचे, काचेचे, चिनीमातीचे, अॅल्यूमिनिअम किंवा जस्ताचे असे. अठराव्या शतकात दौत करण्यासाठी चांदीचा वापर केलेला आढळतो.


दौतीचे आकार गोल, वाटोळा, चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी असतो. प्राण्यांच्या आकाराच्या सुद्धा पितळेच्या दौती वेगवेगळ्या राज्यात वापरात होत्या. उंटाच्या आकाराच्या दौती राजस्थानात आढळतात तर हत्तीच्या आकाराच्या दौती गुजरातेत पहावयास मिळतात. महाराष्ट्रात गोल, षटकोनी किंवा अष्टकोनी दौती वापरात होत्या. इग्रंजी अमलात काचेच्या वेगवेगळ्या आकाराच्या दौती मिळू लागल्या.


शाईत भेसळ होऊ नये, शाई हवेने वाळून जाऊ नये किंवा सांडू नये म्हणून दौतींना झाकण लावत असत. हे झाकण खोचून बसवायचे, आटे असलेले किंवा बिजागरी बसवलेले असायचे.


टाकदौतींचा वापर कमी होऊन फाऊंटनपेनचा वापर जसजसा वाढू लागला तसतशी शाईची मागणी वाढू लागली. मोठ्याप्रमाणावर शाई उत्पादन होऊ लागले. सहाजिकच शाई कारखानदारांनी वेगवेगळ्या आकाराच्या काचेच्या प्रमाणित बाटल्या बाजारात आणल्या, त्याच काचेच्या बाटल्या आज शाईची दौत म्हणून प्रचलित आहेत. सध्या भारतात कॅमलीन,ब्रील,चेलपार्क आणि पार्कर या कंपन्यांच्या शाया बाजारात उपलब्ध आहेत