इतर लेखन साहित्य
लेखणी (Dip Pen, Reed Pen)
- लेखन कलेच्या अगदी सुरूवातीच्या काळात पक्षाच्या पिसाची लेखणी केली जात असे. पिसाचे टोक शाईत बुडवून लिहीत असत.
- साळीन्दराचा काटासुद्धा लेखणी म्हणून वापरात होता.
- हलक्या पोकळ बांबूच्या वीतभर तुकडयास बोरू म्हणत असत. या तुकड्याचे एक टोक तासून लिहीण्याजोगे केले जात असे. ज्या जाडीचे अक्षर हवे असेल त्या प्रमाणात तिरपे टोक तोडून लिखाण केले जाई.
- वीतभर लाकडाची सरळ दांडी त्यास धातूचे निफ लावण्यासाठी एक खोबण असते त्यास टाक असे म्हणत. टाकाचे निफ शाईत बुडवून लेखन केले जात असे. निफावर जेवढी शाई येई त्याप्रमाणात लेखन होत असे. शाई संपताच टाक पुन्हा दौतीत बुडवावा लागत असे. लेखन होताच टाकाच्या खोबणीत निफ उलटे खोचून ठेवत म्हणजे निफाचे टोक तुटत नसे.
- पीसाची लेखणी, बोरू, टाक जावून फाऊंटनपेन आले. फाऊंटेनपेन सुद्धा इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या बॉल पेन आणि जेल पेन चे विविध प्रकार लेखनासाठी वापरले जात आहेत
निफ ( Nib)
टाकाच्या खोबणीत बसवलेले धातूचे टोक म्हणजे निफ किंवा निब होय. काही निफाना टोकाजवळ छिद्र असते, तर काही निफाना लहानशी चीर असते. काही निफाना दोन्ही बाबी असतात. निफाच्या प्रकारावरून हे ठरवले जाते. अक्षर लेखनात वेगवेगळ्या प्रकारची निफे वापरली जातात.
शाईटिपणी (Blotter)
बोरूने किंवा टाकाने लिहीलेला मजकूर सुकावा म्हणून त्यावर रेतीदानातील बारीक वाळूचे कण टाकले जायचे. घरगुती लेखनासाठी याचा वापर होत असे. कार्यालयात मात्र शाईटिपणी वापरली जात असे. शाईटिपणी म्हणजे अर्धवर्तुळाकृती लाकडी ठोकळा. ठोकळ्याच्या परिघाच्या बाजूवर टीपकागद बसवलेला असतो. ठोकळ्याच्या व्यासाच्या बाजूस मध्यभागी धरण्यासाठी लाकडी मूठ असते. लेखन केलेल्या कागदावर विशिष्ट पध्दतीने शाईटिपणी फिरवली असता टिपकागद शाई शोषून घेतो व लेखन सुकते.
टाकाचे स्टँड (Pen Rack)
पूर्वी दौत-टाका बरोबरच टाकाचा स्टँड सुदधा कार्यालयात हमखास असायचा. टाकाचे स्टँड लोखंडी तसेच काचेचे आणि लाकडाचे असत. स्टँडच्या दोन्ही बाजूस टाक किंवा पेन्सिल ठेवण्यासाठी खोबणी असत.
