पार्श्वभूमी

ही माझ्या आजोबांच्या वापरातील दौत. आता जशी फुटक्या अवस्थेत आहे तशीच ती मी लहानपणापासून पहात आलो आहे. मला वाटायच की आपण नोकरीला लागल्यावर आजोबांना एक दौत विकत घेऊन द्यावी. शिक्षण संपवून नोकरीला लागलो तोपर्यंत दौतींचा जमाना संपून गेलेला होता. फाऊंटन पेनच्या जागी बॉल पेन हळूहळू रुळू लागलेले होते. दरम्यानच्या काळात म्हणजेच १९८० मध्ये माझे आजोबा काळाच्या पडद्याआड गेले. परंतू दौत विकत घेऊन देण्याचा लहानपणीचा संकल्प मात्र विस्मृतीत जायला तयार नव्हता. म्हणून आजोबांच्या दौतीसारखी दौत मिळवण्यासाठी शोध घेण्यास सुरुवात केली. ठिकठिकाणचे जुने बाजार, स्टेशनरीची दुकाने पालथी घातली पण आजपर्यंत तरी तशी दौत मात्र मिळाली नाही. परंतू तिथे उपलब्ध इतर दौती मात्र मला खूणाऊ लागल्या. त्यामुळे एका मागून एक दौती घेत गेलो. दौती जमवण्याचा जणू छंदच जडला. आजपावेतो सहाशेच्यावर दौती जमविल्या. जोडीला टाक, निफ, फाउन्टन पेन, शिसपेन्सिल्स असे इतरही लेखन साहित्य जमावण्याचा प्रयत्न केला. त्या सर्व दौती आणि इतर लेखन साहित्याचे हे घरगुती संग्रहालय सर्वांसाठी खुले करीत आहे.